नाशिक : प्रतिनिधी
वेस्टर्न इंडिया स्पोर्टस् असोसिएशनतर्फे रविवारी (ता.५) दुचाकी, चारचाकी, ई बाईक्समध्ये होणाऱ्या `टीएसडी रन ऑफ नाशिक २०२१` ला कोरोनाचा फटका बसत आहे. या गटांमधील नोंदणीस अल्प प्रतिसाद लाभत आहे. `विसा` ने दुचाकी, चारचाकी चालकांना आपले कसब दाखविण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध करून दिली असून अखेरच्य़ा दोन दिवसात आपला सहभाग नोंदवू शकतात. या आगळया वेगळ्या रनसाठी `विसा`च्या जोडीला नाशिक ग्रामीण पोलिसाच्या वाहतूक शाखेचे सहकार्य लाभत आहे. मेरॉट ग्रुपचे नाशिकमधील कोर्टयार्ड हॉटेल व हायासा ई-मोबॅलिटी हे प्रायोजक आहे तर माय एफएम हे मिडीया पार्टनर आहेत.
नाशिकच्या ग्रामीण परिसरात होणाऱ्या `टीएसडी रन ऑफ नाशिक` च्या निमित्ताने वेळ, वेग आणि अंतर कापण्याचा कौशल्य नाशिककरांना पहायला मिळणार आहे. कोरोनाच्या नैराश्याच्या वातावरणातून बाहेर पडून रनच्या रूपाने खिलाडूवृत्ती, सकारात्मकता निर्माण करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. फेडरेशन ऑफ मोटार स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया(एफएमएससीआय) ची या रनला मान्यता आहे.
नोंदणीस अल्प प्रतिसाद
टीएसडी रन चालक-सहचालकांसाठी असणारा एक वेगळा उपक्रम म्हणून नावारूपास आला आहे. त्यामुळेच या रनची घोषणा झाल्यानंतर लगेचच चालक-सहचालक आपला प्रवेश नोंदवून निश्चिंत होतात. यंदा मात्र या रनला कोरोनाचा फटका बसत आहे. त्यात दुचाकी, चारचाकीसाठी आठ ते दहा, ई-बाईक्ससाठी दहाच्या जवळपास नोंदणी झालेल्या आहेत. अद्यापही दोन दिवस बाकी असून कुणीही या गटांमध्ये आपला प्रवेश नोंदवू शकतात.
या रनच्या निमिताने संयोजकांकडून कोरोनाविषयक सर्व नियमांचे तंतोतंत पालन केले जाते, चालक-सहचालक आपली नोंदणी करतानाच त्यांना वाहनांसदर्भातील आवश्यक सूचनांबरोबरच कोरोनांच्या सर्व सूचनांचे पालन करण्याची हमीपत्र त्यांच्याकडून घेतले जात आहे. ग्रामीण भागात असणाऱ्या या रनच्या मार्गांची संयोजकांनी दोन-तीनदा पाहणी केली असून आवश्यक त्या सुविधा रनच्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. सहभागी वाहनांची कागदपत्र तपासणी करून त्यांना क्रमांक देणे, चालक-सहचालकांना सर्व अद्यावत माहिती शनिवारी(ता.४) दिली जाणार आहे. ही सर्व तयारी करण्यास सध्या संयोजक व्यस्त आहे.
रनमध्ये सहभागी होणाऱ्या दुचाकी-चारचाकी चालक-सहचालकांचा गाडीसह विमा असणे बंधनकारक असते. रनसंदर्भातील हा एकदिवसीय विमा यापूर्वी सहजपणे उपलब्ध होता, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमा कंपन्यांनी आपल्या नियमामध्ये बरेच बदल केले असून एक दिवसीय विमा मिळविण्यात चालकांना अडचणी येत आहे. अगदी बोटावर मोजण्याइतकीच एक दुसरी कंपनी हा एकदिवसीय विमा देत असल्याने चालकांची अडचण झाली आहे. यापूर्वी थर्ड पार्टी विमा देखील सहजपणे उपलब्ध व्हायचा मात्र त्यांच्या विमा रक्कमेतही मोठी वाढ विमा कंपन्यांनी केल्याने सहभागी होणाऱ्यांची अडचण होत आहे.
—