वाढवण बंदरामुळे करोडो रोजगार निर्माण होणार  : उन्मेष वाघ

0
नाशिक : प्रतिनिधी
“वाढवण बंदर प्रकल्पामुळे महाराष्ट्रात अंदाजे एक कोटी नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांत अनुषंगिक उद्योग मोठ्या प्रमाणावर उभे राहतील. कृषीमाल निर्यातीस चालना मिळेल, पॅकेजिंग व लॉजिस्टिक क्षेत्र विकसित होईल, तसेच रिअल इस्टेट आणि कौशल्य विकास क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होतील,” असे प्रतिपादन जे.एन.पी.ए. चेअरमन आणि वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेडचे सीएमडी श्री. उन्मेष वाघ यांनी केले.
ते ‘अर्थ-उद्योग’ मासिकाच्या ‘Families in Entrepreneurship & Profession – The Appreciation’ या विशेषांकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. हा कार्यक्रम नाशिक येथील आय. एम. आर. टी. सभागृहात नुकताच उत्साहात झाला.
श्री. वाघ पुढे म्हणाले, “अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर करिअरच्या संधी निर्माण झाल्या आहेत. स्टार्टअप्स व स्वयंरोजगारासाठीही प्रचंड वाव आहे. ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांत रस्त्यांचे जाळे विकसित होईल, त्यामुळे या संपूर्ण पट्ट्‌यात औद्योगिक व आर्थिक गती निर्माण होईल.”
छायाचित्रात डावीकडून आयएमआरटीचे संचालक डॉ. प्रशांत सूर्यवंशी, बांधकाम व्यावसायिक अविनाश शिरोडे,  गुरुपीठाचे नितीन मोरे, अर्थ उद्योगचे संपादक गोरख पगार, मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, जेएनपीएचे चेअरमन उन्मेष वाघ, बापूसाहेब पवार, उद्योजक रमेश पवार, बांधकाम व्यावसायिक  जितूभाई ठक्कर.
———————
ते पुढे म्हणाले, “वाढवण बंदर प्रकल्पाची अंमलबजावणी करताना जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांचा विश्वास जपण्यात आला आहे. विकासाची गाडी तेव्हाच वेगाने धावते, जेव्हा स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन काम केले जाते. हा अनुभव माझ्यासाठीही प्रेरणादायी ठरला.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ना. जि. मविप्र समाज संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपस्थित होते.
यावेळी बांधकाम व्यवसायिक अविनाश शिरोडे, जितुभाई ठक्कर, कसमादे उद्योग संघाचे समन्वयक रमेश पवार, आय. एम. आर.टी. चे संचालक डॉ. प्रशांत सूर्यवंशी, डॉ. तानाजी वाघ, डॉ. बापूसाहेब पवार, डॉ. किशोर कुवर, उद्योजक महेन्द्र भामरे, सुभाष पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘अर्थ-उद्योग’ मासिकाचे संपादक गोरख पगार यांनी प्रास्ताविक आणि मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले, “उद्योगाच्या यशामागे संपूर्ण कुटुंबाचे योगदान असते. कुटुंबप्रधान संस्कृती हा आपल्या समाजाचा आधारस्तंभ असून महिलांचे योगदान विशेष मोलाचे आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला आहे.”
रमेश पवार यांनी आभार मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.