नाशिक : प्रतिनिधी
फ्रावशी टाऊन अकॅडेमी, नाशिक येथे इयत्ता ९ वीत शिकणारा, युवा चित्रकार मयुरेश राजेंद्र आढाव याने आपल्या कला कौशल्याच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव झळकावले आहे. अमेरिकेतील ब्रायन, टेक्सास येथील प्रतिष्ठित डेगा इंटरनॅशनल आर्ट असोसिएशन अँड डे गॅलरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘हॅपी ‘डे’ग्रॅट-२०२५’ इंटरनॅशनल किड्स आर्ट कॉन्टेस्ट मध्ये मयुरेशने आपले सिटीस्केप या विषयावर काढलेले जलरंग या माध्यमात काढलेले चित्र पाठविले होते, परीक्षकांडून हे चित्र निवडल्यागेल्यामुळे पहिल्याच फेरीत नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
पहिल्या फेरीच्या यशातच त्याला या उत्कृष्ट कलाकृतीसाठी या प्रतिष्ठित संस्थेकडून ‘विनर – डिप्लोमा’ प्रदान करण्यात आला आहे, जो त्याच्या कलात्मक प्रतिभेचे जागतिक मानांकन सिद्ध करतो.
४८ देशांतील ७०० हून अधिक कलाकारांवर मात
’वुई आर फुचर’ (We Are Future) या दूरदृष्टीच्या संकल्पनेवर आधारित असलेल्या या स्पर्धेत जगभरातील पाच खंडांतील ४८ देशांमधून ७०० हून अधिक बालकलाकारांनी सहभाग घेतला होता. या मोठ्या स्पर्धेत, मयुरेशची कलाकृती परीक्षक मंडळाच्या नजरेत भरली आहे.
काय होते या परीक्षणाचे निकष
कल्पकता (Imagination), मौलिकता (Originality), सर्जनशीलता (Creativity) आणि तांत्रिक कौशल्य (Technical Skill) या कसोट्यांवर मयुरेशची कलाकृती उत्तम ठरली असून जगभरातील दिग्गज कलाकारांच्या संस्थेकडून डिप्लोमा मिळणे, हे मयुरेशच्या भविष्यातील कला प्रवासासाठी मोठी प्रेरणा ठरणार आहे.
’डेगा’ (DEGA) संस्था काय आहे?
मयुरेशला सन्मानित करणारी ‘डेगा’ (डेगा इंटरनॅशनल आर्ट असोसिएशन अँड डे गॅलरी) ही संस्था आंतरराष्ट्रीय कला विश्वात महत्त्वपूर्ण कार्य करते.
या संस्थेचा उद्देश हा कलाविष्कार, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि विशेषतः तरुण कलाकारांच्या विकासासाठी जागतिक स्तरावर सहकार्य करण्याचा असून
जगभरातील कलाकारांना एकत्र आणण्यासाठी ही संस्था प्रदर्शने, कार्यशाळा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करते.’डेगा’कडून मिळालेला हा डिप्लोमा मयुरेशला केवळ प्रमाणपत्र नसून, आंतरराष्ट्रीय कला क्षेत्रात त्याचे स्थान निश्चित करणारा आहे.
अंतिम फेरीकडे लक्ष
स्पर्धेच्या पहिल्या फेरीत यश मिळवल्यानंतर मयुरेश आता अंतिम फेरीसाठी सज्ज आहे. ‘हॅपी डिग्रॅट-२०२५’ स्पर्धेचा अंतिम निकाल लवकरच जाहीर होणार असून अंतिम फेरीसाठी निवडलेल्या कलाकारांच्या कलाकृती १७ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२५ या कालावधीत ब्रायन, टेक्सास येथील ‘डे’गॅलरीत तसेच ऑनलाईन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात मांडल्या जाणार आहेत.
याच काळात नेहरू आर्ट गॅलरी, मुंबई येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित चित्रप्रदर्शनात मयुरेशचे दोन चित्रे प्रदर्शित होणार आहे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठित गॅलरीमध्ये मयुरेशचे चित्र प्रदर्शित होणार आल्यामुळे त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
मयुरेशचे हे यश नाशिकच्या तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि कलात्मक प्रतिभेचा जागतिक गौरव आहे. त्याच्या कलेवरची त्याची निष्ठा आणि समर्पणभाव भविष्यात त्याच्या सारख्या नवोदित कलाकारांना नक्कीच प्रेरणा देईल, यात शंका नाही.
मयुरेशच्या यशाबद्दल मयुरेशचे मार्गदर्शक व गुरु नाशिकचे सुप्रसिद्ध कलाकार श्री. राहुल पगारे, फ्रावशी टाउन अकॅडमीचे अध्यक्ष श्री. रतन लथ, उपाध्यक्षा सौ. शर्वरी लथ, विश्वस्थ मेघना बक्शी, संचालिका सौ. प्राजक्ता जडे , शैक्षणिक संचालिका तसेच प्राचार्य डॉ. मनीषा पवार, कलाशिक्षिका सौ.शलाका मोहगावकर यांनी मयुरेशचे अभिनंदन केले आहे.