हिमालयातून आपल्या घरांपर्यंत : लाहिरी महाशयांची क्रियायोगाची देणगी

0

“बनत, बनत, बन जाए” — पायरी पायरीने ध्येय गाठले जाते.

या साध्या पण अत्यंत गहन  शब्दांत लाहिरी महाशयांनी साधकांना प्रेरणा दिली की वर्तमान क्षणात संपूर्णपणे जगावे; समोर असलेल्या क्षणाला आपले सर्वोत्तम दिल्याने भविष्यातील प्रवास दैवी क्रमाने स्वतःच आकार धारण करील, याची खात्री त्यांनी दिली.

लाहिरी महाशयांचा जन्म 30 सप्टेंबर 1828 रोजी बंगालमधील घुर्णी या गावी  झाला. ते सरकारच्या लेखापाल पदावर कार्यरत असताना, वयाच्या तेहेतिसाव्या वर्षी हिमालयाच्या पायथ्याशी रानीखेत जवळ त्यांची अमर महावतार बाबाजींशी भेट झाली. Autobiography of a Yogi  मध्ये वर्णन केलेल्या त्या पवित्र भेटीत, बाबाजींनी त्यांना क्रियायोग  या पावन विज्ञानाची दीक्षा दिली आणि दीर्घकाळ लपलेली ही  यौगिक प्रणाली जगात पुन्हा आणण्याचे दैवी कार्य त्यांच्याकडे सोपवले.
बनारसला परतल्यावर लाहिरी महाशयांनी राजघराण्यापासून सामान्य शेतकऱ्यांपर्यंत सर्व प्रामाणिक साधकांना क्रियायोगाची दीक्षा देणे सुरू केले. परमहंस योगानंदांनी स्पष्ट केले की ही प्राचीन साधना  जीवनशक्तीशी थेट कार्य करते, त्यामुळे शरीराचा ऱ्हास मंदावतो आणि आत्म्याची प्रगती वेगाने होते.1861 मध्ये याचे झालेले पुनरुज्जीवन, योगानंदांच्या शब्दांत, “संपूर्ण मानवजातीसाठी एक भाग्यशाली क्षण” होता.
“जसा फुलांचा सुगंध दाबून ठेवता येत नाही,” असे परमहंस योगानंदांनी लिहिले, “तसाच आदर्श गृहस्थ म्हणून शांतपणे जगणारे लाहिरी महाशय आपली जन्मजात तेजस्विता लपवू शकले नाहीत. भारताच्या कानाकोपऱ्यातून भक्तरूपी मधमाशा या मुक्तिप्राप्त सद्गुरूंकडे  दैवी अमृतासाठी आकर्षित होऊ लागल्या.”
लाहिरी महाशयांच्या जीवनाची थोरवी त्यांच्या उदाहरणातच आहे : पती, पालक आणि कर्तबगार व्यावसायिक अशा सांसारिक जबाबदाऱ्या पूर्ण करत असतानाही, आपल्याला अखंड ईश्वरी संपर्कात राहता येते. जगात राहूनही ईश्वर प्राप्ती शक्य आहे का, या प्राचीन प्रश्नाचे मौन पण समर्थ उत्तर त्यांच्या जीवनाने दिले. त्यांनी दाखवून दिले की अंतरातील वैराग्याने जगले, तर हे केवळ शक्यच नव्हे तर स्वाभाविक आहे.

ईश्वरी संपर्काचा आनंद त्यांच्या रहस्यमय स्मितातून हलकेच प्रकट होत असे. त्यांचे नेत्र अर्धवट उघडलेले  — बाह्य जगात केवळ नाममात्र रस दाखवणारे, आणि अर्धवट मिटलेले — अंतरीच्या परमानंदात तल्लीन झालेल्या अवस्थेचे प्रतिबिंब दाखवणारे. आजही असंख्य भक्त त्यांच्या प्रतिमेतून लाभणाऱ्या आध्यात्मिक शक्तीचा अनुभव सांगतात — जी संरक्षण, आरोग्यलाभ आणि गहन ध्यानासाठी निःशब्द आमंत्रण देते. त्यांच्या दृष्टीतून जणू हृदयाला भेदून  जाणारी तीव्र शक्ती प्रकट होते, जी साधकाला अंतर्मुख करून ईश्वराच्या सान्निध्यात खेचून घेते; आणि जी नेहमीच प्रामाणिकपणे  येणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यास तत्पर असते.
त्यांचे सर्वांना दिलेले मार्गदर्शन साधे आणि थेट होते :
“ध्यानाद्वारे तुमच्या सर्व समस्या सोडवा. निरर्थक कल्पनारंजन सोडून प्रत्यक्ष ईश्वर संपर्क साधा… तुमचे मन अंतर्गत सक्रिय मार्गदर्शनाशी एकरूप करा; जीवनातल्या प्रत्येक समस्येचे उत्तर दैवी स्वरूपातील त्या अंतःस्वराकडे आहे.”
त्यांचे प्रमुख शिष्य स्वामी श्री युक्तेश्वरांद्वारे —जे  ज्ञानावतार म्हणजेच प्रज्ञेचे अवतार म्हणून वंदनीय आहेत  — लाहिरी महाशयांचे आध्यात्मिक कार्य अखंड शुद्धतेने पुढे चालू राहिले. 1917 साली श्री युक्तेश्वरांचे शिष्य परमहंस योगानंद यांनी योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (YSS) ची स्थापना केली, जेणेकरून लाहिरी महाशयांनी शिकवलेल्या क्रियायोग या प्राचीन विज्ञानाचा प्रसार व्हावा. आजही YSS त्यांच्या आशीर्वादाचे जिवंत माध्यम म्हणून कार्यरत असून, प्रामाणिक साधकांना जीवनाच्या सर्वोच्च ध्येयाकडे — म्हणजेच दररोजच्या ध्यानाभ्यासातून ईश्वराशी एकत्व साधण्याकडे — मार्गदर्शन करते.
योगावतार — म्हणजे योगाचा अवतार — म्हणून पूजनीय अशा  लाहिरी महाशयांचे जीवन आधुनिक युगाचे अखंड मार्गदर्शन करत आहे. त्यांच्या जीवनातून हे सिद्ध होते की जीवनाचे परम ध्येय, पावलोपावली, आपल्या दैनंदिन कर्तव्यांच्या मध्यातही साध्य करता येते. प्रामाणिकपणे ईश्वराचा शोध घेणाऱ्या सर्वांसाठी त्यांचे शब्द आजही दैवी आश्वासक स्वरासारखे घुमत आहेत :
“बनत, बनत, बन जाए.”
(“प्रयत्न, करत रहा .. आणि एके दिवशी परमलक्ष्य साकार होईल.”)

लेखक : विद्ही बिर्ला
अधिक माहिती : yssofindia.org

● एक हिमालयीन भेट — जिने आधुनिक युगाचे आध्यात्मिक भवितव्यच बदलून टाकले.
● लाहिरी महाशयांनी पुनर्जीवित केलेले — दीर्घकाळ हरवलेले क्रिया योगाचे पावन विज्ञान.
● “बनत, बनत, बन जाए” — ईश्वर शोधकांसाठी त्यांचे कालातीत मार्गदर्शन.
● दैवी संपर्कात अखंड बुडालेले, पण गृहस्थ म्हणून तेजस्वी असे त्यांचे दैनंदिन जीवन.
● त्यांच्या दृष्टीतील अद्भुत शक्ती — जी मार्गदर्शन, आरोग्यलाभ आणि अंतर्मन जागृती प्रदान करते.
● योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (YSS) मधून अखंड प्रवाहित होणारी त्यांच्या आशीर्वादांची जीवनदायी धारा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.