नाशिक : प्रतिनिधी
अशोका सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडीज ॲण्ड रिसर्च कॉलेजच्या २०२३-२५ बॅचमधील विद्यार्थिनी काजल पिल्ले हिने शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिने मुंबईच्या एस.एन. डी. टी. महिला विद्यापीठाच्या बी.एड. परीक्षेत केवळ पहिला क्रमांकच मिळवला नाही, तर तिच्या कामगिरीबद्दल तिला दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
२३ सप्टेंबर २०२५ ला मुंबई येथे पार पडलेल्या ७५ व्या वार्षिक दीक्षांत समारंभात हा गौरव सोहळा पार पडला. महाराष्ट्राचे कुलपती आणि राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, तर सन्माननीय अतिथी म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते. तसेच, माजी लोकसभा अध्यक्ष श्रीमती सुमित्रा महाजन, एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, प्र-कुलगुरू डॉ. रुबी ओझा आणि डॉ. संजय नेरकर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालकही उपस्थित होते. काजल पिल्लई हिला डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
या सोहळ्यात काजल हिला बी.एड. परीक्षेत सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल श्री बी.जे. पटेल डायमंड ज्युबिली मेमोरियल ट्रस्ट प्राईज (सुवर्णपदक) आणि बी.एड. परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल श्री केशव प्रसाद सी. देसाई प्राईज या दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
काजलच्या या यशाने अशोका सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडीज ॲण्ड रिसर्च कॉलेजचा नावलौकिक वाढला असून, शिक्षण क्षेत्रात तिच्या योगदानाचे मोठे कौतुक होत आहे.
—