श्रीलंकेत अनचार्टेड आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात नाशिकचा चित्रकार मयुरेश आढाव याच्या चित्राचाही समावेश

0

नाशिक : प्रतिनिधी
श्रीलंकेत अनचार्टेड आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शन नुकतेच झाले. रेनबो आर्टव्दारे भविण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनात नाशिकचा चित्रकार मयुरेश आढाव याच्या चित्राचाही समावेश होता.

जागतिक कलात्मकतेचा भव्य सोहळा भरविण्याच्या उद्देशाने कोलंबो येथील प्रतिष्ठित क्यूराडो आर्ट स्पेस गॅलरीमध्ये हे कलाप्रदर्शन झाले. या प्रदर्शनात भारत, नेपाळ, इंडोनेशिया, कतार, बेलारूस आणि श्रीलंकेतील 40 समकालीन कलाकारांच्या सर्जनशील कलाकृतीही एकत्र प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. ज्यात चित्रे, रेखाचित्रे, छायाचित्रे, डिजिटल आर्ट आणि प्रिंटमेकिंग यांचा एक प्रभावी संग्रह सादर करण्यात आला.
या कलाप्रदर्शांत नाशिकमधील चित्रकार मयुरेश राजेंद्र आढाव याचाही समावेश होता. मयुरेशने वारकरी या नावाचे आपली कलाकृती सादर केली होती. सदर चित्र आयोजकांकडून निवडण्यात आले. कोलंबो येथील या प्रदर्शनाचे उद्घाटन क्यूराडो आर्ट स्पेसच्या संचालिका सुश्री शनीला अलेस यांच्या हस्ते झाले. यावेळी रेनबो आर्ट ग्रुपचे संस्थापक आणि प्रदर्शनाचे क्युरेटर वीरेंद्र कुमार, आंतरराष्ट्रीय पाहुणे, कला व्यावसायिक आणि कलाप्रेमी उपस्थित होते.

कला ही एक वैश्विक भाषा आहे जी सीमा ओलांडते, अनचार्टेडसारखी प्रदर्शने सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठी आणि जागतिक स्तरावर विविध कलात्मक दृष्टिकोन प्रदर्शित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत, असे  रेनबो आर्टचे संस्थापक वीरेंद्र कुमार यांनी यावेळी व्यक्त केले. कलेमध्ये गहन संदेश पोहोचवण्याची आणि जगभरातील प्रेक्षकांशी भावनिकरित्या जोडण्याची शक्ती आहे. अनचार्टेड या संकल्पनेतून, प्रदर्शनाने कलाकारांना मर्यादा तोडून नवनवीन कलात्मक क्षितिजे शोधण्यासाठी प्रोत्साहित केले. मयुरेशसारख्या तरुण प्रतिभेच्या समावेशामुळे या कार्यक्रमाला एक नवीन आणि प्रेरणादायी आयाम मिळाला, ज्यामुळे सर्जनशीलतेला वय नसते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले, असेही ते म्हणाले.
रेनबो आर्ट हे  भारत तसेच परदेशातील उदयोन्मुख प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित एक मोठे व्यासपीठ असून भारत सरकारच्या एमएसएमई  म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय यांच्या  पुढाकाराने आणि सहकार्याने कार्यरत आहे. ही नोंदणीकृत संस्था म्हणून  कलात्मक उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कलाकारांना महत्त्वपूर्ण प्रदर्शन संधी प्रदान करून सर्जनशील क्षेत्राच्या वाढीस सक्रियपणे हातभार लावते.

सहभागी भारतीय चित्रकार

अनचार्टेडमध्ये भारतातून सहभागी झालेल्या चित्रकारांत बनिता राणी सिंग, भास्कर घोष, चांदना मिश्रा भट्टाचार्जी, ध्रुव कुमार, दिगांता बैश्य, डॉ. अर्चना तिवारी, डॉ. अवनी शाह, डॉ. चेतना अग्रवाल, डॉ. रेणू शाही, गौतम पार्थो रॉय, जसप्रीत मोहन सिंग, मंजू साध, मनोज चक्रवर्ती, एम. डी. अलमर्श सहा, मिनी सुबोध, मोना जैन, मुस्ताजाब शेल्ले, नयना अरविंद मेवाडा, नीलू पटेल, नीना, परिणीता बुजोर बरुआ, प्रलय दत्ता, प्रसंत कुमार माझी, पुनीत मदान, पुष्पांजली पांडा, राजेश कुमार, राम प्रतिहार, रेखा कुमारी, रीटा रॉय, समीर पाल, सुधा मिश्रा, सनी के. डागर, व्यंकट अय्यर, वीरेंद्र कुमार, आणि मयुरेश राजेंद्र आढाव यांचा समावेश होता.

तसेच मुन्ना सर्राफ (नेपाळ), राजिया अब्शन आणि फैजर (श्रीलंका), सुबैर (कतार), तमर सारासेह (इंडोनेशिया) आणि व्हिक्टोरिया वालुक (बेलारूस) या आंतरराष्ट्रीय चित्रकारांचा  यात  समावेश होता. या प्रदर्शनाने संग्राहक, समीक्षक, विद्यार्थी आणि कलाप्रेमींसह विविध प्रेक्षकांना आकर्षित केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.