कवी, लेखक व पेशाने शिक्षक असलेल्या शरद अमृतकर यांचे गीता एक जीवनग्रंथ हे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. लेखकाचे या अगोदर गोधडी, मनागावनी माटी, सोबत काय येते व गीता मनी माय अशी चार पुस्तके प्रकाशित झाली असून गीता एक जीवन ग्रंथ हे श्रीमद्भगवद्गीतेवरील भाष्य असणारे त्यांचे पाचवे पुस्तक आहे. गीता एक जीवन ग्रंथ हे पुस्तक अतिशय सुंदर, वाचनीय व बुद्धीत प्रकाश टाकणारे आहे. लेखकाने श्रीमद् भगवद्गीता या योगेश्वराच्या मधुर वाणीचा जवळजवळ २४ वर्ष अभ्यास केल्यानंतर तसेच श्रीमद्भगवद्गीतेचे चिंतन, मनन करून लिहिलेले गीता एक जीवन ग्रंथ हे पुस्तक त्यांच्या लेखणीतून सर्वसामान्य वाचकांसाठी व गीताप्रेमी भाविकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय सुंदर असून योगेश्वराने अर्जुनास बोध करतेवेळी जसे दृष्य होते. अगदी तसेच दृश्य चित्रकाराने रेखाटले आहे. पुस्तकाच्या मलपुष्ठावर लेखकाचे गीतेविषयी सुंदर, सुगम व संक्षिप्त असे वर्णन करण्यात आलेले आहे. लेखकाने आपले गीता एक जीवन ग्रंथ हे पुस्तक त्यांच्यावर जीव ओतून प्रेम करणाऱ्या त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी अर्पण केलेले दिसून येत आहे. यातून लेखकाची विद्यार्थ्यांविषयीची निष्ठा व प्रेमच दिसून येत आहे.
लेखकाने गीता एक जीवनग्रंथ या पुस्तकात एकूण ३२ श्लोकांचे छान असे विवरण केलेले आहे. एकेका श्लोकाचे विवरण करत असताना लेखकाने श्लोक उलगडून सांगितलेला दिसून येत आहे. तसेच श्लोकाचा अर्थ स्पष्ट करत असताना वेगवेगळे उदाहरणे देखील दिलेले आहेत. अगदी प्रत्येकाला पहिल्या वाचनात कळेल अशा पद्धतीने लेखकाने गीतेतील एकेका श्लोकाचा सुंदर व अतिशय सोप्या पद्धतीने विवेचन केलेले आहे. खरंच योगेश्वराची वाणी अतिशय रसाळ, मंजूळ व मनाला भावणारी आहे हेच या पुस्तकाच्या वाचनातून लक्षात येते. निरपेक्ष व निष्काम भावनेने कर्म करावे. कर्म करीत असताना कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवू नये. निष्काम भावनेने कर्म केले तर भगवंत अनंतपटीने फळ देतो. असा उल्लेख वारंवार लेखकाने आपल्या गीता एक जीवन ग्रंथ या पुस्तकातून केलेला दिसून येत आहे.
निश्चितच गीता एक जीवनग्रंथ हे पुस्तक वाचल्याने आपल्यात प्रकाश पडल्या वाचून राहणार नाही. हे पुस्तक वाचल्याने नकारात्मक दृष्टी जाऊन सकारात्मक दृष्टी निश्चितच येऊ शकते. या पुस्तकाच्या वाचण्याने तक्रार नावाचा जो प्रकार आहे तो देखील कमी होऊ शकतो. अशा पद्धतीचे लेखन लेखकाने आपल्या गीता एक जीवन ग्रंथ या पुस्तकातून केलेला दिसून येत आहे. ” कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशू कदाचन, पत्रम पुष्पम् फलं तोयं, संशयात्मा विनश्यती, गतिर्भरता प्रभू साक्षी ” अशा अनेक श्लोकांचे सुंदर असे विवचन लेखकाने आपल्या पुस्तकातून केलेले आहे. अगदी समुद्रातून मोती वेचावेत त्याप्रमाणे लेखकाने ज्ञानरूपी गीता सागरातून सुंदर असे श्लोक निवडून वाचकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. या ३२ लोकांच्या विवरणासोबतच लेखकाने भगवद्गीतेतील जवळजवळ १८४ शलोकांचा सखोल अभ्यास करून आपल्या मातृभाषेतून वाचकांसाठी त्याचा अगदी संक्षिप्त अर्थ मांडलेला दिसून येत आहे. अगदी पहिल्या वाचनात प्रत्येकाला श्लोकांचा अर्थ निश्चितच कळून आल्याशिवाय राहणार नाही. उदाहरणार्थ कर्म करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका. फळाच्या अपेक्षेने कर्म पाहिजे तेवढे सुंदर होणार नाही. व निष्काम भावनेने कर्म केले तर भगवंत अनंतपटीने फळ देईल. अशा पद्धतीने प्रत्येक शलोकाचे सुंदर सुंदर वर्णन लेखकाने आपल्या या गीता एक जीवन ग्रंथ या पुस्तकातून केलेले दिसून येत आहे.
गीता कशी जीवन उपयोगी आहे, स्वतःचा उद्धार स्वतःच करावा, मनात संशय ठेवू नये, संशयाने विनाश निश्चित असतो, निष्काम व निरपेक्ष भावनेने कर्म करावे अशा पद्धतीचा साधा, सरळ अर्थ या पुस्तक वाचनातून लक्षात येतो. गीता एक जीवन ग्रंथ हे पुस्तक प्रत्येकाने आपल्या संग्रहात ठेवावे असे आहे. तसेच हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावे असे आहे. हे पुस्तक वाचल्याने सकारात्मक दृष्टी तयार होते. तसेच एक नवीन ऊर्जा मिळते. सूर्य कसा दर दिवशी नवीनच वाटतो. त्याप्रमाणे भगवतद्गीता दर दिवशी वाचाल्याने नवीनच वाटते. तिच्यातून दर दिवशी नवनवीन अर्थांचा शोध लागत असतो. अशा ह्या थोर महान भगवत गीतेचा अर्थ समजून घेण्याकरिता गीता एक जीवनग्रंथ या पुस्तकाचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल.
पुस्तकाचे नाव – गीता एक जीवनग्रंथ
लेखकाचे नाव – शरद अमृतकर (नाशिक )
प्रकाशक – प्रकाशक समीक्षा पब्लिकेशन पंढरपूर
किंमत – १२० रुपये
पृष्ठे – ६४
—