गुरू : मौन ईश्वराची व्यक्त वाणी

0
गुरू हा तो अनंत दरवाजा आहे, ज्याद्वारे ईश्वर आपल्या जीवनात प्रवेश करतो. आणि जर आपण आपली इच्छाशक्ती व चेतना गुरूंच्या चेतनेशी जोडली नाही, तर ईश्वर आपली मदत करूच शकत नाही. सध्याच्या काळी शिष्यत्वाचा विचार करणे म्हणजे आपली इच्छा गुरूंच्या इच्छेच्या स्वाधीन  करणे आहे असे समजले जाते. पण सद्गुरूंच्या विश्वव्यापी करुणेशी एकनिष्ठ होणे हा कोणत्याही प्रकारे दुबळेपणा नाही.
स्वामी श्री युक्तेश्वरजी म्हणत, “इच्छेचे खरे स्वांतत्र्य हे केवळ आपल्या पूर्वजन्मीच्या आणि ह्या जन्मीच्या सवयींनुसार, किंवा मनाच्या लहरींप्रमाणे वागण्यात नाही.” सर्वसाधारण माणूस मात्र आपल्या रोजच्या जीवनात– संकटात, दुःखात, आणि अगदी आनंदातही– ही इच्छाशक्ती फारशी रचनात्मकपणे वापरत नाही. खरेतर स्वातंत्र्य म्हणजे आपल्या अहंकाराच्या आदेशांचे पालन करणाच्या स्वभावापासून मुक्त होणे. हे केवळ तेव्हाच शक्य होते जेव्हा आपण सच्च्या गुरूंच्या शिकवणीमुळे शिष्याला अनुभवास येणारे– असीम ज्ञान, सर्वासामावेशक चेतना, आणि सर्वव्यापी प्रेम यांवर ध्यान करतो.
 ‘गुरू’ हा शब्द ‘गु’ (अंधकार) आणि ‘रू’ (ते दूर करणारा) या दोन शब्दांपासून बनलेला आहे. आपण मायेच्या काळोख्या गल्ल्यांमधून जाऊन, आत्मप्रकाशाच्या आपल्या खऱ्या घरी पोहोचेपर्यंत जन्मोजन्मी आपले हात धरून ठेवतात तेच गुरू.
मग आपण खरे गुरू शोधायचे कसे? असे म्हणतात, की आपण गुरूंना शोधत नाही, गुरू आपल्याला शोधतात. जेव्हा आपल्या अंतरात्म्यातील परमसत्यासाठीची ओढ तीव्र होते, तेव्हा उत्तरादाखल ईश्वर आपल्याकडे एक दिव्य मार्गदर्शक — एक गुरू — पाठवतात, जे आत्मसाक्षात्काराकडे जाण्याच्या कठीण प्रवासात आपले मार्गदर्शन करतात. असे गुरू ईश्वरानेच पाठवलेले असतात.  ते ईश्वराशी एकरूप असतात आणि पृथ्वीवर त्याचा प्रतिनिधी म्हणून बोलण्याचा त्यांना  अधिकार असतो. म्हणूनच गुरू ही मौन ईश्वराची वाणी असते. गुरूंनी सांगितलेल्या साधनेचा शिष्य जेव्हा नियमितपणे अभ्यास करतो, तेव्हा तो स्वतःसाठी मायेचा महासागर पार करण्यासाठी जीवनरक्षक असा ज्ञानाचा तराफा तयार करतो.
 श्री श्री परमहंस योगानंद हे अशा खऱ्या गुरूंपैकी एक होते. ते एका दिव्य गुरुपरंपरेतून आलेले होते आणि त्यांनी क्रिया योगाचा मार्ग जगभर प्रसारित करण्याचे कार्य केले. क्रिया योग हा आत्मसाक्षात्कारासाठीच्या अत्युच्च मार्गांपैकी एक आहे. त्यांच्या आध्यात्मिक श्रेष्ठ आत्मचरित्रपर ग्रंथाने, “योगी कथामृत” या पुस्तकाने, कोट्यवधी लोकांच्या जीवनाला उन्नत केले आहे. या पुस्तकात योगानंदजी लिहितात : “क्रिया योग ही एक मनःकायिकविज्ञान पद्धती आहे जिच्याद्वारे मानवी रक्तातील कार्बन कमी होतो आणि ऑक्सिजनने ते पुन्हा भारीत  होते. या अतिरिक्त ऑक्सिजनचे अणू ‘प्राणशक्ती’त रूपांतरित होतात,  ज्यामुळे योगी शरीरातील ऊतकांचा क्षय कमी करू शकतो किंवा थांबवू शकतो.”
 आध्यात्मिक उन्नतीसाठीच्या अशा प्रभावी पद्धतीला मानवजातीपर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक होते. योगानंदजींनी आपले गुरू स्वामी श्री युक्तेश्वरजींच्या आदेशाने, 1917 साली रांची येथे ‘योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया’ (YSS) आणि 1920 साली लॉस एंजेलिस येथे ‘सेल्फ-रिअलायझेशन फेलोशिप’ (SRF) ची स्थापना केली.
 क्रिया योगाच्या शिकवणी SRF आणि YSS द्वारे आत्म साक्षात्कारासाठीच्या गृह-अभ्यास पाठांद्वारे सत्य शोधकांपर्यंत पोहोचवल्या जातात.
असे मानले जाते की जेव्हा श्रद्धाळूची ईश्वरप्राप्तीची तळमळ गहन होते आणि त्याचा  ईश्वरासाठीचा, ध्यास तीव्र होतो तेव्हा सच्चे गुरू स्वतः त्याला मार्गदर्शन करायला येतात. ही आहे सद्गुरूंची दिव्य प्रतिज्ञा. सद्गुरू शरीररूपात असोत  वा नसोत, जर शिष्याने गुरूंशी तादात्म्य साधले तर, ते शिष्याच्या सदैव जवळ असतात, कारण खऱ्या गुरूंची चेतना ही शाश्वत असते. संत कबीर म्हणतात, “सद्गुरू लाभणे हा शिष्यासाठीचा मोठा भाग्ययोग असतो!”
अधिक माहितीसाठी: [yssofindia.org]
लेखिका: नेहा प्रकाश

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.