नाशिक / नागपूर : प्रतिनिधी
महानुभाव साहित्य मराठी भाषेचे वैभव असल्याचे प्रतिपादन रिद्धपूर (जि. अमरावती) येथील मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भगवान श्री चक्रधरस्वामी अध्यासन केंद्राच्यावतीने महंत नागराज बाबा महानुभाव (दिगंबर कपाटे) स्मृती व्याख्यानमाला शुक्रवारी (दि. ४ जुलै) झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर परिसरातील गांधी भवन येथे आयोजित व्याख्यानमालेत प्रमुख वक्ता म्हणून डॉ. आवलगावकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. सुभाष कोंडावार, प्रमुख अतिथी म्हणून मानव विज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, अध्यासन प्रमुख प्रा. भारत मिसाळ उपस्थित होते. दरम्यान, याच कार्यक्रमात राज्यस्तरीय ग्रंथ परिक्षण स्पर्धेतील विजेता स्पर्धकांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यात ज्येष्ठ्य पत्रकार मुकुंद बाविस्कर यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.
डॉ. आवलगावकर म्हणाले की, तत्कालीन महानुभवेतर साहित्यात काव्य, तर महानुभाव साहित्यात गद्य-पद्य आदी दोन्ही प्रकार दिसून येते. गद्य सरळ सोपे असून काव्य भाषा अवघड असते. गद्यामध्ये आकर्षणाची ताकद असून गद्य ही ज्ञानभाषा होऊ शकते. गद्य आणि पद्य असे दोन्ही प्रकार महानुभाव साहित्यात असल्याने मराठी भाषेविषयी उच्चतम श्रेष्ठता महानुभाव साहित्यात पाहायला मिळते.
ते म्हणाले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि मराठी भाषा विद्यापीठ निर्माण झाले. अभिजात भाषेच दर्जा मिळणे आणि मराठी भाषा विद्यापीठ होणे हे मराठी भाषिकांसाठी आनंदाची, समृद्धीची बाब असली तरी अभिजात भाषा म्हणजे काय?, अभिजात भाषेचा दर्जा मिळणे म्हणजे नेमके काय? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य मराठी माणसांमध्ये निर्माण झाले आहे. अभिजात म्हणजे क्लासिकल, परंपरा, समृद्ध परंपरेचा वारसा असलेल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो. अभिजात भाषेचा दर्जा दिला जात असताना तीन-चार निकष काटेकोरपणे तपासले जाते. यामध्ये प्राचीनता, श्रेष्ठता, स्वयंभू, सलगता आदी निकष महत्त्वपूर्ण असल्याचे डॉ. आवलगावकर यांनी सांगितले. अन्य भाषा शिकण्यास विरोध नाही. मात्र, मातृभाषेविषयी भावना जागी ठेवली पाहिजे. समाजाला भाषा भान येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या सोबतच त्यांनी महानुभाव साहित्यातील विविध उदाहरणे देत म्हाईभंट, महंदबा यांच्या साहित्यातील उदाहरण देत मराठी भाषेची महती पटवून दिली.
डॉ. सुभाष कोंडावार यांनी मराठी भाषेचे महत्त्व विशद करताना मातृभाषेतून शिक्षण दिल्यास अधिक समजत असल्याचे सांगितले. महानुभाव साहित्यातील मराठी भाषेचे महत्व याबाबत त्यांनी माहिती दिली. विज्ञान कशाप्रकारे मातृभाषेतून शिकल्यास त्यातील संशोधन समजून घेण्यास मदत मिळेल, असे देखील त्यांनी सांगितले.
अध्यासन प्रमुख प्रा. भारत मिसाळ यांनी व्याख्यानमाला आयोजित करण्याबाबत माहिती दिली. महानुभाव पण त्यातील महंत नागराज बाबा महानुभाव यांच्या विषयी त्यांनी माहिती दिली. सुश्री केशरताई मेश्राम यांच्या दाननिधीतून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. भारत मिसाळ यांनी आभार मानले.
अध्यासनाद्वारे घेण्यात आलेल्या महानुभाव संप्रदायातील विविध साहित्यकृतींवर आधारीत ग्रंथ परिक्षण स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यामध्ये महाविद्यालयीन गटातून प्रथम क्रमांक नम्रता राहेरकर (सातारा ), द्वितीय क्रमांक अनुज मंचावार (रामटेक ), तृतीय क्रमांक रुपाली सोनुने (यवतमाळ ), उत्तेजनार्थ विशाखा डहाट (नागपूर ), तर खुल्या गटातून प्रथम क्रमांक मुकुंद बाविस्कर (नाशिक ), द्वितीय क्रमांक अमोल निंबाळकर ( वरोरा ), तृतीय क्रमांक वासुदेव चव्हाण ( जामनेर ), उत्तेजनार्थ विशाल हिवरखेडकर ( निफाड ) यांची निवड करण्यात आली, अशी माहिती कार्यक्रम समन्वयक तृषाल रामटेके यांनी दिली. उपस्थितांच्या हस्ते सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
—