नाशिक : प्रतिनिधी
येथील नृत्यसाधना कला अकॅडमीच्या डॉ. संगीता पेठकर यांची शिष्या, नृत्यसाधक मानसी अहिरे हिने लय, सूर, पदलालित्य व शिल्पाकृतीसारख्या रचना सादर करत आपल्या नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते ओडिसी रंगमंच प्रवेशाचे. महाकवी कालिदास कलामंदिरमध्ये बुधवारी (दि.2) हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, स्पेक्ट्रमचे संचालक कपिल जैन, प्रा. दर्शन शहा, कथक नृत्यगुरू रेखा नाडगौडा आदी उपस्थित होते.
मानसी हिने मंगलाचरण हे ओडिसी नृत्याच्या सुरुवातीचे पारंपारिक आवाहन सादर केले. यात देवी सरस्वतीची स्तुती केली. नंतर तिने जटाटवी या रावणअष्टकममधील स्तोत्रावर नृत्यरचना सादर केली. ज्यामध्ये भगवान शिव यांचे वर्णन करून त्यांची स्तुती केली. ओडिसीमधील पल्लवी ही एक शुद्ध नृत्यरचना सादर केली. यात हळूहळू फुलणाऱ्या फुलाप्रमाणे शरीराच्या हालचाली, पदलालित्य आणि लयबद्ध प्रकारांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. पुढची रचना अष्टपदी सादर केली. मुखाभिनय आणि हस्तमुद्रांद्वारे नर्तक प्रेम, तळमळ आणि भक्ती यासारख्या भावना सूक्ष्मतेने मांडल्या. तसेच तिने शास्त्रीय नृत्यात अवघा रंग एक झाला हा अभंग सादर केला. मोक्ष हा पारंपारिक नृत्यप्रकार शेवटी सादर केला. या नृत्याचा शेवट आवाहनाने केला, ज्यामध्ये शांती, सुसंवाद आणि सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली.
मनोज देसाई (गायन), विजय तांबे (बासरी), राम प्रसाद (मर्दळ), प्रतीक पंडित (सतार), अनुप कुलथे (व्हायोलिन) यांनी संगीतसाथ केली.