परिपूर्ण जीवनासाठी योगाचे महत्त्व – ११ वा आंतरराष्ट्रीय योगदिन विशेष

0
जेव्हा एखाद्या तरुणाला योगविद्या प्रामाणिकपणे स्वीकारण्यास प्रोत्साहित केले जाते, तेव्हा “योगविद्या माझ्यासाठी इतकी महत्त्वाची का आहे?” असा प्रश्न तो विचारू शकतो, आणि त्याच्या या प्रश्नाचे बौद्धिक पातळीवर उत्तर देण्यासाठी, आपल्याला स्वत:ला त्याचे उत्तर माहीत असणे आवश्यक आहे. गेल्या दशकभरापासून दरवर्षी आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने, आपल्या जीवनातील योगाच्या शाश्वत महत्त्वाचा उत्सव साजरा करताना भारत संपूर्ण जगाचे नेतृत्व करत आहे. तरीही, आपल्यापैकी काही लोकांना हे उमगले आहे की, योगाचा खरा अर्थ त्यांच्या अंतर्यामीच्या अत्यंत वैयक्तिक अनुभवामध्ये दडलेला आहे. सर्व धर्मांमध्ये ज्या ईश्वराशी ऐक्य साधण्याच्या दैवी प्रयत्नांचा उल्लेख केला जातो, त्या प्रयत्नांना गती देणारा व पूर्णत्व प्राप्त करून देणारा मार्ग म्हणजे योग आणि ध्यानाच्या वैज्ञानिक पद्धतींचा नियमित सराव होय.
क्रियायोग ही आध्यात्मिक साधनेची अशी पद्धत आहे, जी प्रामाणिक योग्याला अंतिमत: जीवनाच्या सर्वोच्च ध्येयापर्यंत पोहोचण्यास सक्षम करते. पवित्र भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने त्यांचा शिष्य अर्जुनाशी बोलताना दोन वेळा क्रियायोगाचा उल्लेख केला आहे. ही अचूक आणि महत्त्वपूर्ण वैज्ञानिक पद्धत मानवाच्या अनेक शतकांच्या अज्ञानानंतर एकोणिसाव्या शतकात महान गुरू लाहिरी महाशय यांनी, त्यांच्या शाश्वत गुरू महावतार बाबाजींच्या कृपाशीर्वादाने पुन्हा शोधून काढली. हे क्रियायोगाचे गूढ विज्ञान त्यानंतर लाहिरी महाशयांचे शिष्य, स्वामी श्री युक्तेश्वरगिरी यांनी त्यांचे शिष्य श्री श्री परमहंस योगानंद यांना दिले.
योगानंदजींनी पुढे क्रियायोगाचे जागतिक राजदूत बनण्याची भूमिका स्वीकारली आणि त्यांनी या तंत्रपद्धतीचे फायदे पाश्चात्य जगामध्ये दूरवर पसरवले. आज संपूर्ण जगभरातील लाखो अनुयायी क्रियायोग मार्गाचा अंतर्गत भाग असलेल्या योगध्यानाच्या वैज्ञानिक पद्धतींचा सराव करतात. योगानंदजींनी त्यांच्या ‘योगीकथामृत’ या जागतिक ख्यातीच्या आत्मचरित्रामध्ये प्रेरणादायकपणे लिहिले आहे, “ मायेमध्ये बुडालेल्या किंवा निसर्ग नियमांनुसार वागणाऱ्या माणसाच्या जीवनऊर्जेचा प्रवाह बाह्य जगाकडे वळतो; आणि इंद्रियांच्या माध्यमातून त्याचा गैरवापर झाल्याने तो वाया जातो. क्रियायोगाच्या सरावाने हा प्रवाह उलट फिरतो; जीवनशक्तिला मानसिकरित्या अंतर्मनाच्या विश्वात नेले जाते आणि ती सुषुप्त मेरुदांडतील ऊर्जेशी एकरूप होते. या जीवनशक्तीच्या परीपोषामुळे योग्याच्या शरीर आणि मेंदूच्या पेशींचे आध्यात्मिक अमृताद्वारे नूतनीकरण होते.”
 ‘ योगीकथामृत’  या पुस्तकातून आपल्याला आणखी हेही कळते की, क्रियायोगाचा नियमित सराव केल्याने साधक आपल्या रक्तातील कर्बवायू कमी करून ते प्राणवायूने पुनर्भारीत करू शकतो. अशाप्रकारे अतिरिक्त प्राणवायू मिळाल्याने मेंदू आणि मेरुदंड पुनरुज्जीवित होतात आणि ऊतींचा ऱ्हास थांबतो. क्रियायोगाचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक फायदे अनन्यसाधारण आहेत. हे एक जीवन समृद्ध करणारे तंत्र आहे, जे प्रामाणिक साधकाचे अस्तित्व उन्नत करण्यास मदत करते.
क्रियायोग सर्वांसाठी उपलब्ध आहे आणि सर्व मानव या पद्धतीच्या सरावाद्वारे दैनंदिन जीवनाच्या मर्यादा ओलांडून आध्यात्मिक उंची आणि गहनतेच्या गाभ्यात प्रवेश करू शकतात.
योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (YSS) ही संस्था परमहंस योगानंद यांनी 1917 मध्ये स्थापन केली असून, ती साधकांसाठी भारत, नेपाळ आणि श्रीलंकेत योगानंदजींच्या शुद्ध क्रियायोग शिक्षणाचे प्रसारण करते. सेल्फ-रियलाइझेशन फेलोशिप (SRF) ही YSS ची जागतिक भगिनी संस्था असून ती लॉस एंजेलिस येथील मुख्यालय (मदर सेंटर) मधून हेच कार्य संपूर्ण जगभर करते. योगानंदजींनी ही संस्था ठीक शंभर वर्षांपूर्वी, 1925 साली स्थापन केली होती. गेल्या अनेक वर्षांत लाखो साधकांनी या शिकवणीचा लाभ घेतला आहे.
या जगातील तुमच्या आणि माझ्यासारख्या सामान्य माणसांसाठी, योगाचे जीवन समृद्ध करणारे परिणाम केवळ तेव्हाच अनुभवता येतील जेव्हा आपण क्रियायोगासारख्या वैज्ञानिक पद्धतीचा प्रयत्नपूर्वक आणि भक्तिभावाने सराव करू. आपल्या प्रत्येकासाठी वस्तुत: हाच आंतरराष्ट्रीय योगदिनाचा अर्थ आहे!
अधिक माहितीसाठी संपर्क : yssofindia.org 
लेखक : विवेक अत्रे

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.