नाशिक : प्रतिनिधी
महानगरपालिकेतील पदवीधर शिक्षक असलेले विक्रमवीर डॉ. गणेश लोहार यांनी फक्त चैत्र महिन्यात करण्यात येणारी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा सायकलिंग मोहीम नुकतीच पूर्ण केली. कृण्वन्तो विश्वम् आर्यम् ही टॅगलाईन व भारतीय संस्कृती, योग, पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रचार आणि प्रसार करणे, हा त्यांच्या सायकलिंग मोहिमेचा उद्देश होता. डाॅ. लोहार हे शुक्रवारी (दि.4 ) नाशिकमध्ये परत आले. गुढीपाडव्याच्या दिवशी श्री काळाराम मंदिर येथून रामाचे दर्शन घेऊन मोहिमेला सकाळी सहा वाजता सुरुवात झाली होती.
परिक्रमेचे फळ
ही परिक्रमा तीनवेळा केली तर संपूर्ण परिक्रमेचे फळ मिळते, असे नर्मदा पुराण व मार्कंडेय पुराणात म्हटले आहे. डाॅ. लोहार यांच्या नावावर सायकलिंगमधील पाच रेकॉर्ड्स आहेत. तसेच त्यांना अनेक प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत.
संपूर्ण मौनात परिक्रमा
नाशिक – सापुतारा – वघई – वाजदा – नेत्रंग – राजपिपला – रामपूर असा अत्यंत कठीण व सर्वाधिक घाट असलेला मार्ग त्यांनी निवडलेला होता. पहिला मुक्काम त्यांनी उनई येथे केला. दुसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजता ते रामपूरा येथे पोहचले. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा त्यांनी सकाळी पायी रामपुरा येथून सुरुवात केली. संपूर्ण मौनात त्यांनी तीनवेळा ही २१ किमीची परिक्रमा केली. परिक्रमा झाल्यानंतर त्यांनी सायकलीने त्या परिसरातील सर्व आश्रमांना त्यांनी भेटी दिल्या. तेथील महंतांना भेटून कार्यपद्धती जाणून घेतली. साधना व गोसेवा हेच बहुतांशी आश्रमांचे ध्येय दिसून आले.
रोज १६० ते १७५ किलोमीटर सायकलिंग
परतीचा प्रवास त्यांनी सायकलीने सुरू केला. श्री काळाराम मंदिरात रामाचे दर्शन घेऊन श्रीरामाला संकल्पपूर्तीची माहिती देऊन ते नाशिकमध्ये परतले. रोज साधारणत: १६० ते १७५ किलोमीटर सायकलिंग त्यांनी केली. त्यांच्या सायकलिंग जीवनातील पहिल्यांदाच सर्वाधिक १६०५ मीटर इलेव्हेशन क्लाइंब ही त्यांनी या सायकलिंग मोहिमेत मिळविला, असे त्यांनी सांगितले.
व्यवस्था वाखाणण्याजोगी
आपकी आस्था, हमारी व्यवस्था अशाप्रकारचे गुजरात शासनाचे बॅनर्स, त्यांनी केलेली व्यवस्था वाखाणण्याजोगी होती. संपूर्ण परिक्रमा मार्गावर प्रकाशाची व्यवस्था, जागोजागी औषधोपचार केंद्र, स्वयंसेवी संस्थेच्यावतीने करण्यात आलेली पाणी, नाश्ता, जेवणाची व्यवस्था, नर्मदा मैय्या ओलांडण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेला पूल, दोन्ही तटांवर परिक्रमावाशीयांसाठी उभारण्यात आलेले भले मोठे मंडप, सुरक्षेसाठी जागोजागी पोलिस यंत्रणा, एनडीआरएफची टीम, या परिसरात मगर खूप आहेत म्हणून नदीवर काही अनुचित प्रकार घडू नये व सर्वांना स्नान ही करता यावे, हा हेतूने आंघोळीसाठी शॉवरची व्यवस्था स्वच्छता, टापटीप आदी सर्व गोष्टीचा अत्यंत सूक्ष्म योजना शासनाने केलेली आढळली. महत्त्वाकांक्षा असेल तर काय होऊ शकते? याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. राजा कालस्य कारणं याची प्रचिती आली.