नाशिक : प्रतिनिधी
अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान उत्साहात संपन्न झाले. या अभियानांतर्गत दोन व्याख्याने आणि स्व-संरक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
स्त्री नेतृत्वावर व्याख्यान
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी धनलक्ष्मी पटवर्धन यांनी स्त्री नेतृत्व या विषयावर व्याख्यान दिले. एकूण जनसंख्येच्या ५० टक्के जनसंख्या ही महिला आहेत, तर या ५0 टक्के महिला नेतृत्वामध्ये पुढे आल्या नाही, तर देशाचा विकास हा ५० टक्के मागे राहू शकतो. त्यांनी स्त्री नेतृत्वाचे महत्त्व, त्यांना सामोरे जावे लागणारी आव्हाने आणि त्यांच्या नेतृत्वात येणाऱ्या अडचणींवर सखोल माहिती दिली. विविध समस्यांना सामोरे जाऊन अनेक स्त्रियांनी त्यांच्या करिअरमध्ये प्रचंड प्रगती केली आहे. त्यांनी विनीता सिंग, सुधा मूर्ती, इंद्रा लुई, माधुरी कानेकर अशा यशस्वी स्त्री नेतृत्वाची उदाहरणे दिली.
आयुर्वेद आणि पंचकर्मचे महत्व समजाविले
दुसरे व्याख्यान पंचकर्म तज्ज्ञ डॉ. अनिता कुलकर्णी यांनी आयुर्वेद आणि पंचकर्मचे महत्व समजावून सांगितले. त्यांनी शारीरिक व मानसिक आरोग्याचे स्त्रियांच्या आयुष्यातील महत्त्व सांगितले. तसेच मुलींच्या मासिक पाळी संदर्भात विशेष मार्गदर्शन केले. त्या काळात महिलांनी कोणती काळजी घ्यावी व आहार कसा ठेवावा याबाबत सांगितले. प्रमुखत: तीन शरीरप्रकृती असतात वात, पित्त आणि कफ. या प्रकृतीचा समतोल साधण्यासाठी समतोल सकस आहार, प्राणायाम आणि व्यायाम यांचे महत्त्व पटवून दिले. नस्य, बस्ती यांसारख्या विविध पंचकर्माची माहिती दिली. अर्ली टू बेड, अर्ली टू राईस हा फॉर्मुला प्रत्येकाने वापरायला हवा. सामाजिक माध्यमावर जास्त वेळ खर्च करण्याऐवजी आरोग्यावर वेळ खर्च करावा. ताण, तणाव, चिंता यापासून दूर राहण्यासाठी छंद जोपासावे. स्वतःसाठी महिलांनी विशेष वेळ द्यावा. सूर्यनमस्कार आणि प्राणायाम वजन नियंत्रित करण्यासाठी मदत करतात. मानसिक आरोग्य चांगले राहण्यामध्ये सात्विक आधार हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. सात्विक आहाराने प्रेरणा मिळते असे त्यांनी सांगितले.
दुसऱ्या सत्रात, मार्शल आर्ट तज्ज्ञ सचिन पवार यांनी विद्यार्थिनींना संरक्षणाचे धडे दिले व प्रात्यक्षिके सादर केली आणि मुलीकडून प्रात्यक्षिके करून घेतली. कोणतेही शस्त्र हातात नसताना तुम्ही मोठ्या मोठ्या संकटाला कसे सामोरे जाऊ शकाल, याविषयी प्रशिक्षण दिले. त्याशिवाय मुलींकडे असलेली ओढणी व नखे यांचा वापर स्वरक्षणासाठी किती उत्कृष्टपणे करता येऊ शकतो हे सांगितले.
यांचे मार्गदर्शन लाभले
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे चेअरमन डॉ. अशोक कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे व प्रभारी प्राचार्या डॉ. आशा ठोके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन विद्यार्थी विकास अधिकारी स्मिता बोराडे यांनी केले. अर्चना पंत, स्नेहा साळवे, व काव्याक्षी सोनार या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी ग्लोरिया मोजेस, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची विशेष मदत लाभली.
—