मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या विद्यामंदिरमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे यांचे व्याख्यान

0

नाशिक : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या विद्यामंदिरमध्ये शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी मुख्याध्यापिका नंदिनी कहांडोळ, उपमुख्याध्यापक गंगाधर बदादे, पर्यवेक्षक अतुल करंजे, ज्येष्ठ शिक्षक विवेक पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापिका कहांडोळ यांच्या हस्ते शिवचरित्रकार नेहरे यांना छत्रपती संभाजी महाराज लिखित बुद्धभूषण ग्रंथ भेट देण्यात आला.
शिवचरित्रकार नेहरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक मातीला छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज यांचा ऐतिहासिक कालावधी लाभला. त्यांच्या साम्राज्याचा विस्तार संपूर्ण भारत व भारताच्या बाहेर बलाढ्य राजसत्ता म्हणून बघितले जाते. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी त्या काळातील स्त्रियाचे शौर्य ही तितकेच महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवरायांनी स्त्रियांना विशेष अधिकार, विशेष पद देऊन त्यांनाही स्वराज्याचा मानाचा कणा बनविला. खुद्द राजमाता मासाहेब जिजाऊ, सावित्रीबाई देसाई, मता बेगम, शिवाजीराव काशीद यांची पत्नी पराक्रमी कौशल्याबाई, रायगडाचा चित्त थरारक प्रसंग इतिहासात ज्या वीरबालाच्या नावाने ओळखला जातो हिरकणी, राणी येसूबाईसाहेब या सर्व महापराक्रमी स्त्रिया ही शिवरायांच्या स्वराज्यासाठी संघर्ष करत होत्या. छत्रपती शिवरायांनी प्रत्येक स्त्रीला समानतेची संधी देऊन प्रत्येक स्त्रीला रोजगाराची संधी दिली. ज्यावेळेला स्वराज्यातील मावळे स्वारीसाठी अनेक महिन्याचा कालखंडासाठी शत्रु मुलुखात जात असत, त्यावेळेला स्वराज्यातील कर्तुत्ववान स्त्रियांनी गाव, परगणे, मुलुख, स्वराज्य सांभाळून पराक्रमही गाजविले. प्रत्येक स्त्रीने दुग्धजन्य पदार्थ बनवण्यापासून ते तलवारींना मुठी लावणे, घोड्यांच्या नाली तयार करणे, लगाम बनविणे, बंदुकीत दारू भरणे, गावातील जत्रांचे आखणी करणे, मंगलमय- दुःखद घटना स्वतः पार पाडणे, शेतीसाठी लागणारे अवजारे बनवून धार लावणे, चौक्या पहाऱ्यांवर नजर ठेवणे, शत्रुची  गुप्त माहिती गोळा करणे, पाठशाळा- देवालय संभाळणे, अशी अनेक महत्त्वाचे कार्य छत्रपतींनी स्त्रियांना सोपविली.
त्याचप्रमाणे विशेषत: स्त्रियांना तलवारबाजी, घोडेस्वारी, गनिमी काव्याचे प्रशिक्षण देऊन वेळप्रसंगी दुश्मनाच्या मुलखात जाऊन त्यांचे किल्ले हे काबीज केले. जसे छत्रपती शिवराय आग्र्याच्या कैदेत असताना खुद्द राजमाता मासाहेबांनी स्वराज्याचा कारभार बघून शत्रूंचे गडकोट स्वराज्यात सामील केले.
तसेच अफजलखानाच्या आक्रमणाप्रसंगी मासाहेब जिजाऊंनी स्वराज्याची राजधानी रायगड व्यवस्थित सांभाळून रयतेला न्याय देण्याचे काम केले. म्हणूनच स्वराज्यातील स्त्रिया या जगातील सर्वात आदर्श स्त्रिया म्हणून शिवकाळात त्यांचा बखरींमध्ये उल्लेख केला जातो, म्हणून शिवरायांचा कालखंड हा परिवर्तनाचा कालखंड म्हणून जगाच्या इतिहासात इतिहासकारांनी नोंद घेतली आहे, असे असे प्रतिपादन शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे यांनी व्याख्यानाप्रसंगी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.