नाशिक : प्रतिनिधी
आपण डाॅक्टर्स यांना देवदूत का म्हणावे, हे वारंवार सिद्ध होते. आपल्या दुचाकीजवळच चक्कर येऊन पडलेल्या महिलेला जवळूनच जाणाऱ्या पंचवटी मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर्सने वेळीच आपत्कालीन उपचार केले व स्वतः रिक्षात नेऊन हॉस्पिटलमध्ये पोहचवले.
पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन देवरे यांनी सांगितले की, दिंडोरीरोडवरील गणपती मंदिराजवळील मेरी जॉगिंग ट्रॅक येथे मंगळवारी (दि.21) नेहमीप्रमाणे सकाळी फिरून झाल्यानंतर पंचवटी मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉ.गणेश शिंदे आणि डॉ. अमोल पाटील हे घरी परतत होते. तेव्हा एक मध्यमवयीन महिला शितल वाघ या त्यांच्या दुचाकीजवळ चक्कर येऊन कोसळल्या. या दोन्ही डॉक्टर्सने क्षणाचा विलंब न करता तात्काळ या महिलेला सीपीआर ही इमर्जन्सी ट्रीटमेंट देऊन तिला शुद्धीवर आणले व तात्काळ स्वतः दोघांनी रिक्षामध्ये बसून संजीवनी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल केले.
डाॅ. सचिन देवरे
त्या महिलेची प्रकृती आता स्थिर असून त्या पुढील उपचार घेत आहे. याबद्दल डॉ. सचिन देवरे यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
—