नाशिकमध्ये अभिलाषा नॅचरोपॅथी सेंटरचा शुभारंभ उत्साहात

0

नाशिक : प्रतिनिधी
श्रीमती पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अभिलाषा नॅचरोपॅथी सेंटरचा शुभारंभ येथील डॉ. होमी भाभा गार्डनमध्ये उत्साहात झाला. नाशिकमध्ये लवकरच मोठा कार्यक्रम घेऊन सर्व जनमाणसात निसर्ग उपचाराचे महत्त्व विशद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक प्रथमेश गिते, आयुर्वेदाचार्य डाॅ. एकनाथ कुलकर्णी, डाॅ. पल्लवी दळवी, प्रा. प्र. द. कुलकर्णी, डाॅ. सुशांत पिसे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामंडलेश्वर शिवानंद स्वामी होते.

यांची उपस्थिती
डॉ. योगेश सदगीर, योगाचार्य अशोक पाटील, योगशिक्षक महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यु. के. अहिरे, शुभांगी रत्नपारखी, प्रा. पिराजी नरवाडे, रेवती नरवाडे, डॉ. हेमचंद्र भसे, इसाक शेख, डॉ. राणे, मंदार भागवत, नरेश मालवदे व गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार आदी उपस्थित होते.

गीतातून निसर्गोपचाराचे फायदे
त्रिवार ओंकार घेऊन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. डाॅ. दत्ता कुलकर्णी यांनी निसर्गोपचाराचे फायदे वर्णन करणारे गीत सादर केले. अपर्णा फडणीस यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. ट्रस्टच्या अध्यक्ष प्रा. डाॅ. तस्मिना शेख, ट्रस्टच्या सचिव
सुनिता पाटील व रणजित पाटील यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. प्रा. प्र. द. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डाॅ. तस्मिना शेख यांनी संस्थेचा परिचय करून दिला.

लवकरच निसर्गोपचाराचे शिबीर
प्रथमेश गीते म्हणाले की, अभिलाषा निसर्गोपचार केंद्राचे कार्य हे उल्लेखनीय असून भाभानगर भागात हे केंद्र सुरुवात झाल्याने निसर्गप्रेमींना आनंद झाला आहे. केंद्रास हवी असलेली सर्व मदत मी करेन. तसेच येत्या पंधरा दिवसात निसर्गोपचाराच्या प्रचारासाठी मोठा कार्यक्रम घेऊन सर्व जनमाणसात निसर्ग उपचाराचे महत्त्व आपण विशद करू.

निसर्गनिर्मित उपचार हवे
प्रा. प्र. द. कुलकर्णी यांनी शरीरावर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या औषधांचा मारा करण्याऐवजी निसर्गनिर्मित ऊन, हवा, माती यांचा वापर करून आपली प्रकृती स्वस्थ ठेवावी व व्याधीवर नियंत्रण मिळवावे, असे सांगितले. तसेच महाराष्ट्र शासनाने निसर्गोपचार पदवी अभ्यासक्रमाला मान्यता द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

आपणा ठावे ते इतरांना शिकवावे
शिवानंद महाराज यांनी तस्मिन शेख यांनी कोविड कालावधीत केलेल्या कामाचे कौतुक केले व त्यांना म्हणून कोविड योद्धा म्हणून संबोधले. भगवद्गीतेमधील कर्मण्येवाधिकारस्ते, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तसेच समर्थ रामदास स्वामी यांच्या जे जे आपणा ठावे ते इतरांना शिकवावे, अशा श्लोकाचा संदर्भ देऊन निसर्ग उपचार किती महत्त्वाचा आहे हे विशद केले. कार्यक्रम रविवारी असल्याने स्कंधमातेचे आशीर्वाद तसेच रविवारमधील रवी म्हणजे सूर्याचा आशीर्वाद अभिलाषा सेंटरला मिळाला असून प्रा. डॉ. तस्मिना शेख व सुनिता पाटील यांच्या पुढील कार्यास त्यांनी सुयश चिंतीले.

भगरीचे सेवन करावे
डॉ. पल्लवी दळवी म्हणाल्या की, आजार होण्यापूर्वी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्व प्रयत्न संपल्यानंतर आजारी व्यक्तीस निसर्ग उपचारासाठी नातलग सेंटरवर घेऊन येतात.‌ व्याधी होऊ नये म्हणून निसर्गाने दिलेल्या माती, ऊन, हवा यांचे ग्रहण करावे. तसेच म. गांधी यांनी निसर्गोपचाराचा अवलंब केला होता, याची आठवण त्यांनी सांगितली. सध्या कॅल्शियमचे प्रमाण कमी असल्याने भगरीचे सेवन करणे फायद्याचे ठरेल हे देखील त्यांनी नमूद केले.

आयुर्वेद ही आदर्श जीवनपद्धती
आयुर्वेदाचार्य डॉ. एकनाथ कुलकर्णी यांनी, आयुर्वेद ही आदर्श जीवनपद्धती आहे. फिरत्या चाकावरती देसी, मातीला आकार या भावगीताचा संदर्भ देऊन त्यांनी या गीतात निसर्गातील विविध घटकांचा समावेश आयुष्याशी कसा निगडित आहे हे नमूद केले. स्नेहन प्रकाराची माहिती देऊन, अंतर व बाह्य स्नेहन कसे करावे व त्याचे लाभ त्यांनी सांगितले. शेवटी पसायदान यावर आधारित आरोग्यदान हे स्वलिखित गीत त्यांनी म्हटले.

निसर्गोपचार हाच सर्वश्रेष्ठ
डॉ. सुशांत पिसे म्हणाले की, निसर्गोपचार ही जीवन जगण्याची कला आहे. पूर्वीची व आत्ताची जीवन पद्धती यातील फरक विशद करून निसर्ग उपचार हाच सर्वश्रेष्ठ उपचार आहे, असे विविध उदाहरणे देऊन त्यांनी सांगितले. कोरोना कालावधीत लागलेल्या चांगल्या सवयी उदाहरणार्थ मास्क वापरणे, नेहमी हात धुणे, गुळणा करणे यामुळे आज ५० टक्के लोकांना डॉक्टरांकडे जावे लागत नाही, असे म्हणून त्यांनी स्वच्छतेचे महत्व विशद केले. निसर्गनिर्मित पाण्याचे सेवन केले तर कॅल्शियम कमतरतेवर आपण विजय मिळवू शकतो असे त्यांनी सांगितले.

योगनृत्यास वन्समोअर

रिना पवार व तन्वी पवार यांनी याप्रसंगी योगनृत्य केले.
अपर्णा फडणीस यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. जीवराम गावले यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.