नाशिक : प्रतिनिधी
येथील निराधार मुलींचे पाय धुतले अन् त्यावर स्वस्तिक काढले. तसेच त्यांना आभुषणे भेट देऊन नटविण्यातही आले. तेव्हा या मुलींच्या चेहऱ्यावर फुललेले हसू पाहून सर्वच भावविभोर झाले होते. निमित्त होते, नृत्याली भरतनाट्यम अकॅडमीतर्फे घारपुरे घाटावरील आधाराश्रात कुमारिकापूजन कार्यक्रमाचे.
अकॅडमीच्या संचालिका सोनाली करंदीकर आणि त्यांच्या शिष्या खुशी, पूर्वा, समृद्धी, निहारिका, ऐश्वर्या, सुचिता यांनी या 70 जणींचे रितीरिवाजानुसार कुमारिका पूजन केले. या कुमारिकांचे पाय धुवून त्यांना हळद-कुंकू लावून त्याच्या पायावर स्वस्तिक काढले. त्या मुलींना कान, गळ्यातली आभूषणे घालून दिली. हे सगळे झाल्यावर या मुलींच्या चेहऱ्यावर हसु फुलले होते. कुमारिकांचे पूजन झाल्यावर सगळ्यांनी फेर धरून भोंडला खेळाचा आनंद लुटला.