नाशिक : प्रतिनिधी
माणूस हा निसर्गासोबत जगण्यासाठीच निर्माण झाला आहे. मात्र, या निसर्गाचे मूळ घटक पृथ्वी, आप (जल), तेज (अग्नी), वायू, आकाश यांच्याशी त्याचा ताळमेळ बसत नाही, तेव्हा माणसात व्याधी निर्माण होतात. अशा स्थितीत योगाच्या सहाय्याने या पंचमहाभूतांचा आपल्याशी समतोल साधला जाईल. त्यातून व्याधी निवारण होईल. पण, हा योग निसर्गाच्या सान्निध्यात करा, म्हणजे निसर्गयोगी व्हा, असे प्रतिपादन योगशिक्षक संघाच्या जिल्हा नियोजन समितीचे उपाध्यक्ष तथा राज्य ग्रामीण प्रकोष्ठ प्रभारी डाॅ. तस्मीना शेख यांनी केले.
यांनी केले आयोजन
योगा फाउंडेशन, महाराष्ट्र संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवतंर्गत व्याख्यानमाला आयोजित केली आहे. त्या अंतर्गत डाॅ. तस्मीना शेख बोलत होत्या. प्राकृतिक चिकित्सामय योग हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
माणूस निसर्गापासून दूर
डाॅ. शेख म्हणाल्या की, प्रकृतीशी समन्वय ठेऊन कसे जगावे, हे आपल्याला समजले पाहीजे. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. ते घेण्याची क्षमता आपल्यात असावी. आपण निसर्गासोबत नाही गेलो तर तो आपल्यासोबत कसा येईल ?. पूर्वीचे लोक निरोगी होते. पण, हळूहळू माणूस निसर्गापासून दूर गेला अन् व्याधीग्रस्त झाला. आता या समस्येतून बाहेर पडण्यासाठी योगशास्त्र आपल्या जीवनात आणावे.
योग हा कल्पवृक्ष
योग हा कल्पवृक्ष आहे. त्यातील यम, नियमांचे पालन करावे. निसर्गात जाऊन योगासने व प्राणायाम करावा. दैनंदिन आयुष्यात प्रत्याहाराचा अवलंब करावा. धारणा, ध्यान करावे. यातून चित्तनिरोध होईल. यातून मन शांत होऊन आरोग्य लाभ मिळेल, असेही डाॅ. शेख यांनी सांगितले.
आहाराबाबत मार्गदर्शन
प्रकृती सोबत कसे जगावे याबद्दल “लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान, आरोग्य मिळे” ही उक्ती विशद केली. तसेच आहार कसा घ्यावा? तसेच प्रकृतीमय कसे जगावे याबद्दल सांगितले. त्यांनी आपला आहार हा ओरिजनल, सीजनल व रीजनल असावा हेही नमूद केले. तसेच श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. शेवटी त्यांनी ओ पालन हारे ही अत्यंत भक्तिपूर्ण अशी प्रार्थना म्हटली.
यांची उपस्थिती
यावेळी, योगशिक्षक संघाचे पदाधिकारी स्वामी शिवानंद महाराज, डॉ.अनंत बिरादर, डॉ. सुशांत पिसे, डॉ. पल्लवी दळवी, डॉ. प्रज्ञा पाटील, डाॅ. योगेश सदगीर, डॉ. प्रीती त्रिवेदी, कृणाल महाजन, प्रसाद कुलकर्णी, जीवराम गावले, दत्ता कुलकर्णी, पी.डी कुलकर्णी, मनोज लोणकर, सुनिता पाटील, रणजित पाटील आदी उपस्थित होते. यू. के. अहिरे यानी प्रास्ताविक केले. डाॅ. अमित मिश्रा यांनी सूत्रसंचालन केले. राहुल येवला यांनी आभार मानले.
—