अनादि निर्गुण
खरंतर जीवनात शक्ती शिवाय कोणतंच कार्य पूर्ण होत नाही.
आम्ही शक्तीस्वरुपी अशा आदिशक्तीची उपासना करतो. यम, नियम, संयम, काया, वाचा यांच पावित्र्य सांभाळलं की, आत्म्याचं तेज वाढत. या उपासनेतून मित्थ्याची अशाश्वतता जाणत शाश्वताला आत्मसात करणाऱ्या आत्मबोधाच्या परडीत सद्भावनेचा जोगवा मागावयाचा आहे.
—
शरद ऋतुच्या आगमनाने वातावरणात पवित्रता निर्माण होऊन, अंत:करणात सद्भावना निर्माण होते. या सद्भावनेच्या पोटी उर्जा निर्माण होऊन ती शक्ति नावाने ओळखली जाते. या शक्तिची रुपाने, स्वरुपाने, गुणाने केलेली आराधना, हीच ‘नवरात्री’.
खरंतर जीवनात शक्तिशिवाय कोणतंच कार्य पूर्ण होत नाही. निसर्गाने बहुतांश शक्ती नारीला प्रदान केल्यामुळे, शक्ती स्वरुप म्हणून आदिशक्ती, अर्थात देवीची पूजा करतात. यम, नियम, संयम, मन, काया, वाचा याचं पावित्र्य सांभाळलं की, आत्म्याचं तेज वाढतं. महिषासुर हे आपल्या जीवनातील आळस, मरगळ, जडत्व, मंदबुद्धी याचं प्रतिक आहे.
अंत:करणातील शक्तिरुपी देवीच्या उपासनेने सकारात्मकता निर्माण होते. सार्वजनिक आणि आध्यात्मिक जीवनात चैतन्याला अडसर निर्माण करणाऱ्या महिषासुराचा नाश करणे, हीच नवरात्रीची उपासना .
जीवनात माता आणि माती यांचं अतूट नातं आहे. मातेच्या उदरातून जन्म घेऊन मातीतच सामावून जावं लागतं.
घटस्थापनेत मातीचा घट हे मानवी देहाचं, त्यातील पाणी हे आत्म्याचं, त्यावरील श्रीफळ वैभवाचं, तर उगललेलं धान हे चैतन्याचं प्रतीक मानलं जातं. आणि जीवनाला प्रकाशमान करणारा नंदादीप हे त्या परमात्म्याचं प्रतीक मानलं जातं. येथे आत्मा आणि परमात्मा यांचा सुरेख संगम साधुन, ज्ञान आणि वैराग्याचा फुलोरा बांधला की, मनात भक्ती भाव जागृत झाल्याशिवाय राहत नाही.
‘प्रथमं शैलपुत्रीती, व्दितीयं ब्रह्मचारिणी। तृतीयं चंन्द्रघन्टेति, कुष्मांडीति चतुर्थकम।। पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच।सप्तमं कालरात्रिश्च महागौरीति चाष्टकम।। नवमं सिद्धिदां प्रोक्तां नवदूर्गा: प्रकीर्तिता:।।
असुरी शक्तींचा नाश करण्यासाठी, सर्व देवादिकांनी आपापल्या शक्तीचं दैवतीकरण केलं आणि त्यातून निर्माण झाली ती ‘अनादि निर्गुण प्रगटली भवानी’
पुढे विविध अवतार कार्यामुळे उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी, दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा या नावाने सर्व श्रेष्ठ देवता म्हणून गौरविल्या गेल्या. आजही देवी हे स्त्रीशक्तीचं रुप मानलं जातं.
पवित्र अशी संपत्ती घेऊन लक्ष्मीस्वरुप कन्या घरात जन्म घेते. हातात कमळ घेऊन, सकारात्मक उर्जा निर्माण करणारी ‘शैलपुत्री’, कमंडलु व जपमाळ घेऊन, पवित्र पात्र व तप:श्चर्येने संयमाचं सामर्थ्य प्राप्त करणारी ‘ब्रह्मचारिणी ‘, सौम्य, स्वरुपता, शितलता, विनम्रता अशा विविध सोळा कलांनी नटलेली, नकारात्मकता दूर लोटून सकारात्मक ऊर्जा देणारी ‘चन्द्रघंटा’. सृजन निर्माण करण्याची शक्ती देवानंतर स्त्री मध्ये आहे त्यामुळे रचनात्मक व अद्भुत शक्तीमुळे नवजीवाची वाढ करुन, ब्रह्मांडाला निर्माण करणारी ‘कुष्मांडा’, ममता आणि वात्सल्याचा भाव जागृत करणारी धैर्य व प्रेमाने सुरक्षा देणारी, अंगी परीपक्वतेमुळे चांगल्या सृष्टीची निर्मिती करणारी आदिशक्ती ‘स्कंदमाता’, दृढता व आत्मविश्वासाने पुढे नेणारी, कुविचार व दुष्टवृत्तीचा नाश करुन, पापरुपी दानवांपासून सौरक्षण देणारी ‘कात्यायिणी’,
वेळ प्रसंगी अक्राळविक्राळ रुप धारण करुन, तिसरा नेत्र उघडणारी, कुविचारांच्या दानवांचा संहार करुन, आत्म्याचं तेज वाढवणारी ‘कालरात्रि’. दातृत्वात स्त्रीला खरा संतोष प्राप्त होतो. त्यामुळे स्वत:चे अनुभव देऊन दुसर्याला अनुभवी बनवणारी ‘आई’ म्हणजेच ‘मातागौरी’. हे सारे स्त्री शक्तीचे स्वरुप आहेत.
मनाची प्रफुल्लता व तोंडाला गोडवा निर्माण करणारा शब्द म्हणजे ‘आई’. वात्सल्याचा सागर, आत्मज्योत जागविणारी, रक्षणकर्ती, आणि स्नेहाचा भरलेला घडा म्हणजे ‘आई’. या भवानी मातेचं केवळ नऊ दिवसच चिंतन न करता, श्रद्धा, भावना व प्रेमाने अखंड चिंतनाचा नंदादीप आमच्या हृदयात तेवत ठेवावयाचा आहे.
मूर्तिकार रंगछटांनी देवीची सुबक व सुदंर मूर्ति बनवतो. त्या मूर्तीच्या चेहर्यावरील चमक, हास्य, डोळ्यातला स्नेह पाहून आमचं क्षणभरासाठी देहभान हरवतं. मग एका जड मुर्तीकडे पाहून आमचं देहभान हरवतं, तर आमच्यातील चैतन्यरुपी देवीचं सदैव स्मरण केल्यास जीवनाला सदैव सकारात्मकता का प्राप्त होणार नाही. आई म्हणजे ममता, आई म्हणजे आत्मा. म्हणूनच आत्मा आणि परमात्मा या दोहोंचा संगम म्हणजे देखील ‘आई’ च .
‘या देवी सर्वभूतेषु चेतनेत्य भिर्धायते। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
तत्त्वांचा बोध होऊन, समंजसपणे विचारांचं मुल्याकंन करावयास लावणारी शक्ती म्हणजे ‘आई भवानी’.
जीवनात अष्ट सात्विक भाव सदैव जागृत ठेऊन, अंत:करणाची शुद्धता जोपासणे, हाच खरा ‘जागर’.
“अहंकार बलं, दर्पं, कामं, क्रोधं, परिग्रहम् । विमुच्य निर्मम:शांतो ब्रह्मभूयाय कल्पते।।
अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध, परिग्रह हे सर्व टाकून व मीपणाचा त्याग करुन शांत बुद्धीच्या जोपासणेने ब्रह्मरुपता प्राप्त होते.
आत्मा आणि परमात्मा यामध्ये वासनेचा पडदा आहे, मीपणाचा पडदा आहे. हा पडदा दूर झाल्याशिवाय ब्रह्मस्वरुपता प्राप्त होत नाही. आमच्या हृदयात विराजमान असलेल्या चैतन्यमय शक्तीचं वासनेच्या आवरणामुळे मिलन होत नाही.
मित्थ्याबाबींना आपलसं मानत राहील्यामुळे जीवनात सोय झाली पण समाधान मात्र हरवलं आहे.
मित्थ्याची खरी अशाश्वतता जाणत शाश्वताला आत्मसात करणं म्हणजेच आत्मबोधाची परडी. या शक्तीदेवतेला आत्मबोधाच्या परडीत सद्विचारांचा जोगवा मागावयाचा आहे.
भाष्यकारांनी आमच्यातील षड् रिपुंना राक्षसाची उपमा दिलेली आहे. मधु हा काम, कैटंक हा क्रोध, महिषासुर लोभ, रक्तबीज हा मोह, शुम्भ हा मद व निशुम्भ हा मत्सर.
या अंत:करणात दडलेल्या राक्षसी शक्ती व व्यभिचार, आत्याचार, भ्रष्टाचार, दूराचार अशा बाह्य दानव शक्तींमुळे जीवन असाह्य झालंय. आमच्यातील अंतर्बाह्य दानवांचा नाश करण्यासाठी, अंत:करणात साठविलेल्या दैवी शक्तींना जागृत करण्याचं काम उपासनेतुन करावयाचं आहे.
‘सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यबकें गौरी नारायणि नमोस्तुते।।
सर्वांच्या जीवनात मांगल्य प्राप्त होवो, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
– अनंत भ. कुलकर्णी, बीड
—