
नाशिक : प्रतिनिधी
श्रीमती पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्टतंर्गत निसर्ग विद्या निकेतन या निसर्गोपचार व योग ॲकडमीतर्फे निसर्गोपचार डिप्लोमाचा परीक्षेत शलाका गोटखिंडीकर यांनी 92.66 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.
अभिलाशा निसर्ग उपचार केंद्र,पसायदान, नाशिक येथे पदविका प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून योगशास्त्र व रेकीचे अभ्यासक पुरूषोत्तम सावंत व नर्मदा नदी परिक्रमा नुकतीच पूर्ण केलेल्या शलाका सावंत उपस्थित होत्या. व्यासपीठावर इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनच्या महाराष्ट्राच्या सहनिमंत्रक, उत्तर महाराष्ट्राच्या संयुक्त सचिव आणि श्रीमती पुष्पावतीबाई चॅरीटेबल ट्रस्टतंर्गत अभिलाषा निसर्ग उपचार केंद्र व निसर्ग विद्या निकेतनच्या अध्यक्ष डाॅ. तस्मीना शेख आणि ट्रस्टच्या सचिव आणि ऑर्गनायझेशनच्या जिल्हा संयुक्त सचिव सुनीता पाटील, रणजित पाटील उपस्थित होते.
प्रमाणपत्र कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. डाॅ. तस्मीना शेख यांनी प्रास्ताविक केले. सुनीता पाटील यांनी पुढील कामकाज व करत असलेले कार्य विद्यार्थ्यांसमोर ठेवले. तसेच निसर्ग विद्यानिकेतनतंर्गत जे नवीन अभ्यासक्रम सुरू होणार आहेत, त्याची माहिती दिली.
शलाका सावंत यांनी आपल्या पाच महिन्यांच्या नर्मदा परिक्रमेबद्दलचे अनुभव सांगितले. अर्चना दीक्षित यांनी वऱ्हाड निघालय लंडनला या एकांकिकेचा थोडासा भाग सादर केला.

संजय सोनवणे यांनी आपण आईला गमावल्यानंतर काय यातना होतात याचे एक सादरीकरण केले, जे मन हेलवून टाकणारे होते आणि त्याने बऱ्याच जणांना रडवलं. त्यानंतर डॉ. विजय चौरसिया आणि डॉ. सोपान पाटील यांनी त्यांना निसर्ग विद्या निकेतनमध्ये आलेले अनुभव सांगितले.
—
